भारतीय ‘नाट्य’ आविष्कार
भारतीय ‘नाट्य’ आविष्कारांचे समर्पक संशोधन प्रशंसनीय
-कुलगुरू डॉ. हरिलाल मेनन
‘नाट्य’ हे मानवी भावनांच्या सांस्कृतिक आविष्कारातून अभिव्यक्त होणारे अभिनव कला मध्यम आहे. म्हणून, ज्या भाषेत, समाजात आणि प्रदेशात नाटक लिहिले जाते, ते त्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत आकार घेत असते. भारताची सांस्कृतिक विविधता भारतीय नाट्यामधून प्रस्तुत झाली आहे. नाट्यक्षेत्रातील परिवर्तनाचा समर्पक शोधनिबंधाद्वारे घेतलेला परामर्श, संदर्भग्रंथाच्या रूपाने प्रकाशित होणे प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. हरिलाल मेनन यांनी केले.
गोवा विद्यापीठाचे अतिथी अध्यापक संशोधन संचालनालय, संत सोहिरोबानाथ आंबिये अध्यासन आणि कला अकादमी गोवाचे नाट्य कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित ‘तिसरा सहस्रकारंभी भारतीय नाट्य आणि नाटककार’ या शोधनिबंध संग्रहाच्या प्रकाशन समारोहात ते बोलत होते. व्यासपीठावर गोवा विद्यापीठाच्या कुलसचिव – डॉ. राधिका नायक, अतिथी अध्यापक संशोधन संचालनालयाच्या संचालक – डॉ. सविता केरकर, कला अकादमी गोवाच्या नाट्य कला महाविद्यालयाचे प्राचार्य- प्रा. रामराव वाघ, केपे येथील शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य – डॉ. जॉयदीप भट्टाचारजी, शोधनिबंध संग्रहाचे संपादक प्रा. विनय मडगावकर तसेच नाट्यकर्मी, निर्माता दिग्दर्शक साईश देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते.
भारतातील विविध प्रदेश, समाज आणि संस्कृतींच्या प्रभावामुळे नाटकाचे बदलते स्वरूपही कालानुक्रमे परिवर्तीत होत राहिले. अशा भारतीय नाट्यकृतींचे संशोधनात्मक समालोचन ग्रंथांच्या स्वरूपात प्रकाशित झाल्याने ते संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी या सर्वांसाठी लाभदायी ठरणार आहे, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाच्या कुलसचिव – डॉ. राधिका नायक यांनी केले. संत सोहिरोबानाथ आंबिये अध्यासन आणि मराठी विभाग यांनी शैक्षणिक सहल, राष्ट्रीय परिसंवाद असे समर्पक आणि उपयुक्त उपक्रम आयोजित केलेत. त्यापैकी गोमंतकातील २५ ज्येष्ठ साहित्यिकांचे केलेले ध्वनिचित्रमुद्रण संशोधकांना लाभदायी ठरणार आहे. महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावरील विविध भाषा आणि साहित्य अभ्यासाच्या अभ्यासक्रमात ‘नाटक’ समाविष्ट करण्यात आले आहे. ‘भारतीय नाट्य’ या विषयाच्या अध्ययनासाठी आणखी एका अभ्यासपूर्ण साधनग्रंथाची भर लक्षवेधी ठरणार असल्याचा विश्वास, नाट्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रामराव वाघ यांनी व्यक्त केला.
केपे येथील शासकीय महाविद्यालयात आयोजित ‘तिसरा सहस्रकारंभी भारतीय नाट्य आणि नाटककार’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात भारतीय नाटकातील विविधतेची चर्चा झाली. परिसंवाद संस्मरणीय झालाच, त्यात प्रस्तुत झालेले शोधनिबंध, संग्रहरूपाने येत असल्याने त्याचे संदर्भमूल्य अनमोल असल्याचे मत केपे येथील शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य – डॉ. जॉयदीप भट्टाचारजी यांनी व्यक्त केले. नाट्यकर्मी, निर्माता दिग्दर्शक साईश देशपांडे यांनी संशोधनात्मक दृष्टीकोनातून अशा शोधनिबंध संग्रहाची आवश्यकता, वैशिष्ट्ये आणि महत्त्व या विषयी प्रभावीपणे विवेचन केले.
गोवा विद्यापीठाच्या संत सोहिरोबानाथ अंबिये अध्यासन (व्ही.आर.पी.पी.) आणि शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, केपे-गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या राष्ट्रीय परिसंवादात विविध भाषांमध्ये लिहिलेल्या भारतीय नाटकांचे प्रकार आणि विविधता यांवर गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विद्वानांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले होते. गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. विनय मडगावकर यांनी प्रस्तुत शोधनिबंध संग्रहाचे संकलन आणि संपादन केले आहे. शोधनिबंध लेखक डॉ. हनुमंत चोपडेकर, डॉ. रमिता गुरव, डॉ. कोज्मा फेर्नंडीस, प्रा. सोनिया सावंत तसेच ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. जनार्थनन आणि डॉ. कार्लोस फेर्नंडीस यांना पुस्तक प्रत आणि सन्मानपुष्प प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले.
अतिथी अध्यापक संशोधन संचालनालयाच्या संचालक – डॉ. सविता केरकर यांनी संचालनालयाच्या विविध अध्यासनांच्या माध्यमाने सुरु असलेल्या दर्जेदार कार्याचा परिचय करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कला अकादमी गोवाच्या नाट्य कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नांदीच्या शानदार प्रस्तुतीकरणाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. गोमंतकीय महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांनी ही नांदी रचली होती. माननीय कुलगुरू डॉ. हरिलाल मेनन यांनी संत सोहिरोबानाथ आंबिये यांना पुष्पहार अर्पण केला आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रा. विनय मडगावकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दिव्या गावस आणि शेफाली नाईक यांनी उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले. प्रा. स्नेहल गुरव यांनी प्रस्तुत केलेल्या श्रवणीय ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रा. विनय बापट, प्रा. चिन्मय घैसास, प्रा. पूर्वा वस्त, प्रा. सतीश नार्वेकर, सचिन संभाजी, नंदेश नाईक, अभिजित फोवकर, सचिन शिरोडकर, मयूर धोंड यांनी सहकार्य केले